९२२६२३४७३७ nadhawade190836@gmail.com
Gram Panchayat Logo

ग्रामपंचायत नाधवडे

ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग (स्थापना: १९५२)

नाधवडे ग्रामपंचायत - आमचा वारसा
आमचा वारसा

समृद्ध गाव नाधवडे

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, निसर्गसंपन्न आणि अध्यात्मिक वारसा लाभलेले गाव.

गावाची ओळख

थोर परंपरा लाभलेल्या, संतांच्या आणि कर्मयोग्यांच्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव म्हणजे नाधवडे. कोल्हापूर-विजयदुर्ग राजमार्गावर वसलेले हे गाव लोकसंख्या व क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत मोठे आहे. सह्याद्रीच्या तटबंदीने वेढलेले आणि निसर्गाने नटवलेले हे गाव 'तळकोकणातील नंदनवन' म्हणून ओळखले जाते.

१२ वाड्या

गावाचा विस्तार १२ वाड्यांमध्ये विभागलेला आहे.

१२ धरणे

मुबलक पाणीसाठा आणि सुपीक जमीन.

१२ देवळे

अध्यात्मिक आणि धार्मिक वारसा.

भौगोलिक वैभव

नाधवडे गावाच्या आग्नेय दिशेस असलेला सालवा डोंगर गावाचे भूषण आहे. येथे दाट हिरवीगार झाडी आणि निसर्गदत्त अभयारण्य आहे. सालव्याचे पठार सुमारे दोन किमीचे असून ते पाचूसारखे हिरवेगार दिसते.

गोठणा नदी: गावाच्या मधोमध वाहणारी ही नदी बारमाही प्रवाहाने परिसर सुजलाम् सुफलाम् करते. श्री महादेवाच्या मंदिरासमोरील उमाळ्यांनी या नदीचा उगम झाला आहे.

पर्यटन विशेष

नापणेचा धबधबा आणि सालवा डोंगर हे पर्यटकप्रेमींचे मुख्य आकर्षण केंद्र आहेत.

Nature

ग्रामदैवते आणि मंदिरे

नाधवडे गावात अनेक जागृत दैवते आहेत. येथील उत्सव आणि परंपरा सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत.

श्री नवलादेवी (ग्रामदेवता)

१९७८ साली जीर्णोद्धार झालेले हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. दर मंगळवारी देवीची वारी असते. नवरात्रोत्सव आणि देवदिवाळी येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

श्री महादेव मंदिर

पूर्वाभिमुख मंदिर, जिथे गोठणा नदीचा उगम होतो. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या समोरील गोठणा नदीचा प्रवाह भक्तांची तहान भागवतो.

श्री विठोबा-रखुमाई

याला 'प्रतिपंढरपूर' असेही म्हटले जाते. मंदिरासमोरील तळीचे पाणी पवित्र तीर्थ मानले जाते. येथे दीड दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो.

श्री चवाटीमाता

येथे शिमगा (होळी) सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. देवीची पालखी ५ दिवस गावात फिरते आणि दसऱ्याला सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो.

श्री नागेश्वर

हे शंकराचे स्थान आहे. येथे त्रिपुरारी पौर्णिमा (टिपर) आणि देवदिवाळी ग्रामस्थ एकत्र येऊन साजरी करतात.

श्री सिंहासन

७२ खेड्यांमधील फक्त साडेतीन सिंहासनापैकी नाधवडे गावातच अखंड सिंहासन आहे, जे या गावाचे वैशिष्ट्य आहे.

गोठणा नदी - त्रिवेणी संगम

महादेवाच्या देवालयासमोरून उगम पावलेली गोठणा नदी, पूर्वेकडील पाण्याचा उमाळा आणि पश्चिमेकडील गोड्या पाण्याचा झरा मिळून येथे त्रिवेणी संगम झाला आहे.

पंचक्रोशीतील लोक येथे अस्थी विसर्जनासाठी येतात. हा परिसर अत्यंत पवित्र आणि शांततापूर्ण आहे.